अनधिकृत बांधकामावरील कारवाईसाठी गेलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना भूमाफियांनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार उल्हासनगरमध्ये घडलाय. ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेरात कैद झालीये. उल्हासनगरच्या कॅम्प ५ परिसरात कपालेश्वर मंदिराच्या मागे मोठं अनधिकृत बांधकाम सुरू असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त तुषार सोनावणे आणि गणेश शिंपी हे त्यांच्या पथकासह याठिकाणी कारवाईसाठी गेले होते. त्यावेळी बांधकाम करणाऱ्या सतपाल सिंग आणि त्यांच्या मुलांनी महापालिका अधिकाऱ्यांच्या कारवाईत अडथळा आणत त्यांना धक्काबुक्की केली आणि त्यांना गेटच्या आतमध्ये डांबून ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही महापालिका पथकानं हे अनधिकृत बांधकाम निष्कसित केलं. हा सगळा प्रकार मोबाईल कॅमेरात चित्रित करण्यात आला. याप्रकरणी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात भूमाफियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सावंत व उल्हासनगर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी या कारवाईची माहिती दिली (व्हिडिओ - अजय दुधाणे)