सर्वोत्कृष्ट किताबासाठी ब्रेन्टनं 'तो' फोटो काढला नव्हता. जाणून घ्या भीषण रहस्य. <br /><br />जमिनीवर वावर असलेला गेंडा हा हत्तीनंतर दुसरा महाकाय प्राणी. आशिया आणि आफ्रिका खंडात प्रामुख्याने आढळणाऱ्या या प्राण्याची शिंगासाठी शिकार केली जाते. त्यांच्या शिंगाना मोठी किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात आहे. त्यातून पारंपरिक चिनी आणि थायी औषधांमध्ये त्यांच्या शिंगाचा वापर केला जातो, म्हणून आफ्रिकेतले शिकारी आपलं पोट भरण्यासाठी आणि रग्गड पैसा कमावण्यासाठी गेंड्यांची शिकार करतात. गेंड्यांची शिकार करणं कायद्यानं गुन्हा आहे तरीही फॉरेस्ट रेंजरच्या नजरेत धूळ फेकून इथले स्थानिक शिकार करतात. २०१६ मध्ये ब्रेन्ट आफ्रिकेत गेले होते. तेव्हा नॅशनल जिओग्राफीकने गेंड्यांच्या अवैध शिकारीवर प्रकाश टाकणारी एक मोहिम हाती घेतली होती, त्या मोहिमेचा भाग म्हणून ब्रेन्ट या परिसरात होते. या दिवसांमध्ये त्यांनी काही छायाचित्र घेतली होती. त्यातला एक म्हणजे रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडून असलेल्या या महाकाय प्राण्याच्या मृतदेहानं ब्रेन्ट स्ट्रीरटॉन यांना यंदाचा ‘वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इअर’चा किताब मिळवून दिला. जगभरातील हजारो फोटोग्राफर्सने वेगवेगळे फोटो पाठवले होते. त्यातल्या काही खास फोटोंची निवड अंतिम स्पर्धेसाठी झाली. पण फक्त सर्वोत्कृष्ट फोटोच्या किताबासाठी ब्रेन्टनं नक्कीच तो फोटो काढला नव्हता.