<p>सोलापूर : डॉ शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात अटक असलेल्या महिला कर्मचारी मनीषा मुसळे माने यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. मनीषा मुसळे माने यांची पोलीस कोठडी संपली होती. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी अजून तपास करावयाचा आहे. आणखीन काही पुरावे सादर करावयाचे आहेत. त्यासाठी आणखीन तीन दिवसांची पोलीस कोठडी मागितली. महिला आरोपीचे वकील प्रशांत नवगिरे यांनी कोर्टासमोर दहा मुद्दे मांडून वाढीव पोलीस कोठडीची गरज काय असा सवाल उपस्थित केला. सर्व बाबी समोर आहेत असं कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी कोर्टात माहिती देताना सांगितलं की, हॉस्पिटलमधील 27 जणांचे जबाब आम्ही घेतले आहेत. आणखीन जबाब घ्यायचे आहेत. त्यासाठी पोलीस कोठडीची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारी वकिलांचे युक्तिवाद ऐकून आणि आरोपी महिला वकीलांचे युक्तिवाद ऐकून दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.</p>