<p>अहिल्यानगर : राज्यासह संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात पावसाचं आगमन झालय. चारही बाजूंनी घनदाट डोंगरांनी वेढलेला आणि विविध पशुपक्ष्यांनी गजबजलेला हा परिसर म्हणजे निसर्ग प्रेमींसाठी एक पर्वणीच. या परिसरात पावसाच्या आगमनानंतर कळमजाई देवीचा धबधबा वाहू लागलाय. कोसळणाऱ्या जलप्रपाताच्या गडगडाटात आणि पक्ष्यांच्या सुरेल किलबिलाटात पर्यटक रमत आहेत. घारगावपासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर कळमजाई देवीचं मंदिर आहे. मंदिरापासूनच उगम पावणारा हा धबधबा डोंगरावरून कोसळताना भव्यतेची अनुभूती देतो. पक्ष्यांचे नाद, डोंगरातून वाहणाऱ्या झऱ्यांचं पाणी यामुळं परिसर मनाला गारवा देणारा अनुभव देतो. धबधब्याजवळ पोहोचण्यासाठी काही अंतर वाहनानं गेल्यानंतर उरलेला टप्पा जंगलातून पायपीट करत पार करावा लागतो. "धबधब्याजवळ जाणं आणि बंधाऱ्यात उतरणं हे अत्यंत धोकादायक आहे. उंचावरून कोसळणाऱ्या पाण्याचा अंदाज येत नाही. त्यामुळं सुरक्षिततेच्या दृष्टीनं दूर राहणं आवश्यक आहे," असं घारगाव वनपाल हारुण सय्यद यांनी सांगितलं.</p>