<p>सोलापूर : आषाढ एकादशीला म्हणजे सहा जुलैला आषाढी एकादशीचा सोहळा संपन्न होत आहे. आषाढी एकादशीनिमित्त भाविकांची मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या भाविकांना श्रींचा प्रसाद म्हणून मंदिर समितीमार्फत बुंदी आणि राजगिरा लाडू प्रसाद दिला जाणार आहे. विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक दर्शन झाल्यानंतर श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी आणि राजगिरा लाडू खरेदी करतो. मंदिर समितीच्या बुंदी लाडू प्रसादाला भाविकांतून मोठी मागणी होते. प्रत्येक भाविकांना प्रसाद मिळेल या दृष्टीनं 13 लाख 50 हजार बुंदी लाडू आणि 60 हजार राजगिरा लाडू प्रसाद तयार करण्यात आलेला आहे. यामध्ये बुंदी लाडू प्रसाद मंदिर समितीमार्फत तयार केला जातो. तर राजगिरा लाडू प्रसादाची बाहेरून खरेदी केली जाते. 70 ग्रॅम वजनाचे दोन बुंदी लाडू कागदी पिशवीत पॅकिंग करून प्रति पाकिट 20 रुपये प्रमाणे आणि 25 ग्रॅम वजनाचे दोन राजगिरा लाडू पॅकिंग करून प्रति पाकीट 10 रुपयेप्रमाणे भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे, अशी माहिती मंदिराचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितली.</p>