<p>बीड : खासदार सुप्रिया सुळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के (Rajendra Mhaske) यांच्या वाढदिवसानिमित्त बीड शहरात मोठे होर्डिंग लावण्यात आले आहेत. परळी शहरात गोळीबारात सरपंच बापू आंधळे यांची हत्या करण्यात आली होती. होर्डिंग्जवर बापू आंधळे खून प्रकरणातील फरार आरोपी बबन गीतेचादेखील फोटो लावण्यात आल्यानं आता याची राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे. काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीं राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याच्या वाढदिवसाच्या बॅनरवर वाल्मीक कराडचा फोटो आल्यानंतर मोठी चर्चा झाली होती. त्यानंतर ते बॅनरदेखील काढण्यात आले होते. परंतु, राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बॅनरवर अशा पद्धतीने आरोपीचे छायाचित्र झळकल्यानं याचीदेखील जोरदार चर्चा होऊ लागली आहे. राजकीय पक्षांमध्ये गुन्हेगारांचं उदात्तीकरण कसं होतं, याचं उदाहरण या निमित्तानं नागरिकांना पाहायला मिळत आहे. </p>
