<p>गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात गेल्या पाच दिवसापासून पाऊस सुरू असून नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. गडचिरोली शेजारील छत्तीसगड राज्यातही पाऊस सुरू असल्याने छत्तीसगडवरुन वाहणाऱ्या इंद्रावती, पामुलगौतम आणि पर्लकोटा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तर पर्लकोटा नदीच्या पुलावरुन पाणी वाहत आहे, ज्यामुळं भामरागड मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. दुसरीकडं आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम भागातील रस्ते आणि पुलाचं बांधकाम पूर्ण झालं नाही. त्यामुळं आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात देखील आदिवासी बांधवांना तुडुंब भरलेल्या नदी, नाल्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. भामरागड तालुक्यातील गुंडेनूर नाल्यावर पुलाचं बांधकाम सुरू आहे. मात्र, ते अपूर्ण असल्यानं अतिदुर्गम लाहेरी पलीकडील डझनभर गावांना नाल्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.</p>