<p>लेह (हिमाचल प्रदेश) : लेह-मनाली मार्गावर (Leh Manali Highway) दरड कोसळल्याने अनेक प्रवासी पर्यटक रस्त्यात अडकले आहेत. यामध्ये महाडमधील तीन कुटुंबांचा समावेश आहे. अमोल महामुणकर, समीर सावंत आणि राजेंद्र दरेकर त्यांच्या परिवारातील काही सदस्य असे एकूण नऊजण या दरड दुर्घटनेमध्ये अडकले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून दरडीमुळं रस्ता बंद होऊन येथील वाहतूक ठप्प झाली आहे. तर परिसरात प्रचंड कडाक्याची थंडी देखील आहे. २ अंश सेल्सिअस तापमानात अन्न, पाणी आणि निवाऱ्याशिवाय त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, मदतीसाठी त्यांची धडपड सुरू आहे. प्रशासनाकडून मदत मिळावी तसंच अडकलेल्या प्रवाशांपर्यंत तातडीने अन्न, औषधे आणि उबदार कपड्यांची मदत पोहोचवावी अशी कळकळीची मागणी अडकलेल्या पर्यटकांनी केली आहे.</p>