<p>शिर्डी : शिर्डीत 'गुरुपौर्णिमा उत्सव' उत्सवात पार पडला. आज गुरुपौर्णिमा निमित्ताने शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. अनेक भक्तांनी विविध मार्गाने आपली गुरुभक्ती साईचरणी व्यक्त केली. मंदिरात आलेला प्रत्येक भक्त आपल्या इच्छेनुसार साईचरणी दान अर्पण करतो. अश्याच तीन भक्तांनी आज गुरुपौर्णिमेची पर्वणी साधत साई चरणी सोने आणि चांदी अर्पण केले आहे. साईबाबांच्या मूर्तीला दररोज आरतीवेळी भक्तांनी अर्पण केलेला सुवर्ण मुकुट घालण्यात येतो. याच भावनेतून एका भक्ताने 566 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट, ज्याची किंमत 59 लाख रुपये आहे. दुपारच्या मध्यान्ह आरतीला हा मुकुट साईबाबांच्या मूर्तीला घालण्यात आला. याचबरोबर 3 लाख 5 हजार रुपये किंमतीच्या 54 ग्रॅम वजनाचे सोन्याचे फूल (ब्रॉच) अर्पण करण्यात आले. हे ब्रॉच साईबाबांच्या मूर्तीला वस्त्र परिधान केल्यानंतर चढविण्यात येणाऱ्या दुपट्ट्याला लावण्यात येणार आहे. तिसऱ्या एका साईभक्ताने 2 किलो वजनाचा चांदीचा हार सुद्धा गुरुदक्षिणा म्हणून दान स्वरूपात अर्पण केला आहे. या व्यतिरिक्त साईभक्त दानपेटीतही मोठ्या प्रमाणात दान जमा झाल्याची माहिती, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.</p>