<p>अकोला : संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांच्यावर आज काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाई फेकून त्यांना मारहाण केली. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, संभाजी ब्रिगेड संघटना ही 2007 पासून काम करत आहे. प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करण्याआधी प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्यावर हल्लेखोरांनी का हल्ला केला नाही?, त्यावेळी हे हल्लेखोर मूग गिळून गप्प बसले होते का? त्यावेळी हे हल्लेखोर कुठे होते? या हल्ल्याचा पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ता म्हणूनही त्यांनी निषेध व्यक्त केला आहे. हल्लेखोरांना पोलिसांनी पकडून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करायला हवेत. तसेच याबाबत सरकारनंदेखील या बेजबाबदार पोलिसांवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. </p>