<p>रायगड : गेल्या काही दिवसापासून कोकण आणि सह्याद्री परिसरात मुसळधार पावसाने जोर धरला आहे. त्याचा मोठा परिणाम सावित्री नदीच्या पाणी पातळीवर दिसून येत आहे. विशेषतः महाबळेश्वर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळं सावित्री नदीवरील रानबाजीरे धरण भरून वाहू लागले आहे. सध्या धरणाची पाणी पातळी धोक्याच्या टप्प्यावर पोहोचली आहे. रानबाजीरे धरण हे सावित्री नदीवरील एक महत्त्वाचे जलसाठा केंद्र आहे. यामार्गे महाबळेश्वरमध्ये पडणारे पाणी थेट महाड शहरात आणि आजूबाजूच्या गावामध्ये पोहोचते. सध्या या धरणाची पाण्याची पातळी निर्धारित क्षमतेपेक्षा तब्बल पाच मीटरने अधिक भरली असून धरण ओव्हरफ्लो झाले आहे. परिणामी नदीतून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असून महाड शहर आणि नदी किनाऱ्यालगतच्या गावांमध्ये पुराचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून महाड तालुका प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच पोलीस प्रशासन यांच्यामार्फत नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खास करून महाड शहरात पूरपस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. </p>