<p>अमरावती : मेळघाटात साठ ते सत्तर वाघ आहेत. मात्र, अतिशय घनदाट जंगल असणाऱ्या मेळघाटात वाघ दिसणं म्हणजे ही मोठी बाब. भर रस्त्यावरून पाच वाघ एकाच वेळी जात असताना सेलफोन कॅमेऱ्यात टिपलेला हा व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. सध्या पाच वाघांचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. त्याचं झालं असं की, परतवाडा ते धारणी मार्गावर धावणाऱ्या प्रवासी वाहनातून रोरा गावालगत रस्त्याच्या बाजूला जंगलात वाघ दिसताच वाहनचालकाने वाहन थांबवलं. गाडीतील काही प्रवाशांनी एक वाघ सेलफोन कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न केला असता अजून एक मोठा वाघ रस्त्याच्या दिशेने येताना दिसला. हा गाडीतील सर्वच प्रवाशांसाठी सुखद धक्का होता. कारण केवळ एक नव्हे तर एकामागे एक अशा एकूण पाच वाघांनी रस्ता ओलांडला. एकाच वेळी पाच वाघ पाहण्याचा आनंद या प्रवाश्यांनी घेतला आणि आपल्या सेलफोन कॅमेऱ्यातही टिपला.</p>