<p>बीड : शहरात सुरू असलेली विविध विकासकामे करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दर्जेदार कामं करावीत. बीडकरांच्या स्मरणात राहील तसेच शहराच्या वैभवात भर घालणारे कामं करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिलेत.</p><p>उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी बीड शहरातील चंपावती क्रीडा मंडळ, कंकालेश्वर मंदिर, जिल्हा रुग्णालय येथे सुरू असलेल्या व नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या विकास कामांची पाहणी केली. यावेळी आमदार विक्रम काळे, आमदार विजयसिंह पंडीत, माजी आमदार अमरसिंह पंडीत, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.राजेश देशमुख, आदिवासी विकास विभागाचे सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव विजय वाघमारे, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण आदी उपस्थित होते. </p><p>कंकालेश्वर मंदिरातील कामाची माहिती घेतली : कंकालेश्वर देवस्थान हे बीड शहरासह जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. कंकालेश्वर देवस्थान परिसरात नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या विकास कामांमध्ये पारंपरिक व आधुनिकतेचा संगम साधत बीडकरांना कायम स्मरणात राहील असे दर्जेदार कामे करावी. विकास काम करताना ती कामे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार व टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावे. भाविकांना सर्व सोयीसुविधा मिळतील अशा सर्व बाबींचा आराखड्यामध्ये समावेश करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.</p>