<p>शिर्डी : श्रद्धा आणि सबुरीचा महामंत्र देणाऱ्या शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी अनेक भाविक देश-विदेशातून शिर्डीत दाखल होत असतात. कुणी रोख स्वरूपात, कुणी सोनं-चांदी अर्पण करून आपली श्रद्धा चरणी अर्पण करतं. याच भावनेतून आज स्वातंत्र्यदिनानिमित्त हैदराबाद येथील रहिवासी साईभक्त डॉ. जी. हरीनाथ आणि जी. पुष्पलता यांनी तब्बल 17 लाख 73 हजार 834 किमतीच्या सोन्या-चांदीच्या वस्तू अर्पण केल्या आहेत. या देणगीमध्ये 191.5 ग्रॅम वजनाचं सोन्याचं ताट तसंच 283 ग्रॅम वजनाचा चांदीचा अगरबत्ती स्टँड यांचा समावेश आहे. सोन्याचं ताट पारंपरिक डिझाइनसह आकर्षक रितीनं तयार करण्यात आलं आहे. तर चांदीचा अगरबत्ती स्टँड नाजूक व सुंदर नक्षीनं सजवलेला असून त्यावर श्री साईबाबांची अमूल्य शिकवण श्रद्धा आणि सबुरी या शब्दांचे सुंदर अक्षरात कोरीव काम करण्यात आलं आहे. या कलाकृतीत भक्तीभाव आणि कलाकुसरीचा अद्वितीय संगम दिसून येतो. सदर देणगी स्वीकारल्यानंतर साईबाबा संस्थानच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी डॉ. हरीनाथ आणि पुष्पलता यांचा साईबाबा मूर्ती व शॉल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गाडीलकर यांनी या देणगीमुळं साईबाबांच्या सेवेत आणखी एक अमूल्य भर पडल्याचं सांगितलं.</p>