<p>बीड : जिल्ह्याला गेल्या चार दिवसापासून जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. नदी, नाल्यांना पूर आला आहे, तर शेतजमीन आणि पीके पाण्यात गेल्याने तोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून घेतला आहे. जिल्ह्यात 17 महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याची शासकीय आकडेवारी आहे. मात्र, जिह्यात सर्वच ठिकाणी खरीप पिके धोक्यात आली आहेत. सोयाबीन, मूग, उडीद, कापूस, बाजरी या पिकांचे नुकसान झाले आहे. पिकात गुडघाभर पाणी आहे. पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.</p><p>भाजीपालावर्गीय पिकावर सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे कीड रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. अतिवृष्टीने होत्याचं नव्हतं केलं आहे. केलेला खर्चही पिकांमधून निघेल की नाही याची चिंता आहे. सोयाबीन पिकावर अनेक स्वप्न पाहिली होती. मात्र, त्या स्वप्नांवर पाणी फिरल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. असाच आणखी चार दिवस पाऊस लागून राहिला तर कोणतेच पिक हातात येणार नाही, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.</p>