<p>ठाणे : सतत दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे मध्य रेल्वेची मंगळवारी वाहतूक विस्कळीत झाली. सततच्या मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाइन समजली जाणारी लोकल सेवा मंगळवारी (19 ऑगस्ट) दुपारी पूर्णतः ठप्प झाली. परिणामी, हजारो चाकरमान्यांना मुंबई ते ठाणे या ट्रॅकवरून पायी चालत घर गाठावं लागलं. रेल्वे सेवा संध्याकाळपर्यंत पूर्ववत न झाल्यामुळे सकाळी कामावर गेलेल्या प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. तासन्तास प्लॅटफॉर्मवर वाट बघूनही गाड्या सुरू न झाल्यानं संतप्त प्रवाशांनी शासनाच्या नियोजनशून्य कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. अनेकांनी सरकारविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत नाराजीचा सूर आळवला. सकाळीच पावसानं जोरदार सुरुवात केल्यामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचलं. त्यामुळे वाहनांची मोठ्या प्रमाणावर कोंडी झाली. अशा स्थितीत अनेकांनी पर्यायी मार्ग म्हणून रेल्वेनं प्रवास करण्याचा निर्णय घेतला. मात्र संध्याकाळच्या वेळेत, जेव्हा नागरिक कामावरून घरी परतत होते, तेव्हा मध्य रेल्वेचं वेळापत्रक पूर्णपणे कोलमडलं. लोकल गाड्या तब्बल 1 तास उशीरानं धावू लागल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. या उशीरामुळे कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर गर्दी वाढली आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. अनेक प्रवाशांना या स्थानकांवरून चालतच ठाण्याकडे निघण्याची वेळ आली.</p>