<p>बुलढाणा-पोलिसांनी एका तरुणाकडून नांदुरा शहरातून तब्बल 41 तलवारी जप्त केल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखा आणि अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या पथकानं ही कारवाई केली. नांदुरा शहरातील शाहीण कॉलनी येथील शेख वसीम शेख सलीम हा तरुण तलवारी विक्रीसाठी घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांना मिळाली होती. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी नांदुरा शहरात छापा टाकून शेख वसीमला ताब्यात घेतलं. त्याच्याकडून 41 तलवारी, एक मोबाईल आणि दुचाकी असा एकूण 1 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी त्याच्यावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सणासुदीच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात तलवारी जप्त झाल्यानं बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. </p>