<p>कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस कोसळतोय. विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्राला पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय. कोल्हापुरात पूर परिस्थितीमुळे नदीशेजारील शेतात पाणीच पाणी पसरले आहे. कित्येक एकर शेती पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान होत आहे. तर 43 फुटांवरून अर्थात नदीच्या धोका पातळीवरून वाहणाऱ्या पंचगंगा नदीचे रूप पाहून कुणालाही धडकी भरू शकते. याच पंचगंगा नदीच्या राजाराम बंधारा या ठिकाणच्या विस्तीर्ण पात्राचे कोल्हापुरातील इलियास मुल्लाणी यांनी ड्रोनच्या माध्यमातून चित्रण केलं आहे. सर्वत्र ढग भरून आले असताना मध्येच आलेल्या सूर्यकिरणांमुळे हे दृश्य नयनरम्य जरी वाटत असले तरी तितकीच पूर परिस्थिती भयानकही दिसत आहे. पुराचं पाणी अनेकांच्या घरात शिरल्याचंही या ड्रोनद्वारे घेतलेल्या छायाचित्रातून दिसून येत आहे. </p>