<p>बीड : अतिवृष्टीने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदीकाठच्या कोथरूड गावात शेतामध्ये आजही गुडघाभर पाणी आहे. त्यामुळं पूर्ण पीक खराब झालं आहे. अशीच परिस्थिती हजारो शेतकऱ्यांची आहे.</p><p>अनेक संकटांचा सामना करताना शेतकरी पुरता खचून गेला आहे. दुबार पेरणी करूनही अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती केली आहे. सोयाबीन, कापूस याला पाणी लागल्याने ते जळून गेले आहे. त्यामुळं केलेला खर्चही निघणार नसल्याने शेतकरी रडकुंडीला आला आहे. शेतातलं सगळं वाहून गेलं. मुख्यमंत्री साहेब मुलांचे शिक्षण कसे करायचे? असा सवाल बीडच्या माजलगाव तालुक्यातील शेतकरी विचारत आहेत. गेल्या चार दिवसापासून बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीनं शेतकऱ्यांच्या हातात आलेला घास हिरावून घेतला आहे. दुपार पेरणी केली होती तरी देखील पदरात काहीच पडणार नाही. तत्काळ नुकसान भरपाई द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.</p>