<p>रायगड : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे. अशात, शनिवारी मध्यरात्री गणेशभक्तांनी भरलेली एक लक्झरी बस कशेडी बोगद्याच्या जवळून जात असताना अचानक टायर फुटल्याचा मोठा आवाज झाला. काही क्षणांतच टायरमधून बाहेर पडलेल्या ठिणग्यांमुळे बसला आग लागली. या भीषण घटनेत बस पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवानं चालकाच्या तत्परतेमुळे सर्व प्रवाशांचे प्राण वाचले. टायर फुटल्यावर चालकानं तातडीनं बस थांबवून प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढलं. त्यामुळे कोणालाही इजा झाली नाही. मात्र, काहीच वेळात बस आगीत पूर्णपणे राख झाली. घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस तसेच खेड आणि महाड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीनं घटनास्थळी पोहोचल्या. आगीच्या भीषणतेमुळे महामार्गावर वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. </p>