<p>नागपूर - नागपूरच्या दाभा परिसरात तब्बल ५१ फूट उंच गणरायाची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. राज्यातील हा सर्वात उंच गणपती असल्याचा दावा आयोजकांनी केलाय. ७ मूर्तिकारांनी सुमारे ४५ दिवसात बाप्पाची विशाल मूर्ती साकारली आहे. मूर्तीचा आकार खूप मोठा असल्याने जागेवरच ही मूर्ती साकारण्यात आली असून विसर्जन ही जागेवरच केले जाणार आहे. त्यासाठी मूर्तीच्या आत विशेषत्वाने पाईपलाईन टाकण्यात आली आहे. त्यामुळे या आगळ्या वेगळ्या बाप्पाची चर्चा नागपूरच नाही तर संपूर्ण विदर्भात होतेय. चितारओळीचे प्रसिद्ध मूर्तिकार विजय वानखेडे यांच्या विशेष योगदानमुळे बाप्पाची मोठी मूर्ती साकारणे शक्य झालं असल्याचं आयोजकांनी सांगितलं. सार्वजनिक श्री महोत्सव मंडळ दाभा या ठिकाणी राज्यातील सर्वात उंच गणेश मूर्ती स्थानापन्न झाली आहे. ५१ फूट उंच बाप्पा साकारण्यासाठी लागणारी माती ही भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव येथून आणण्यात आलेली आहे. विदर्भात आंधळगाव येथील मातीला विशेष मागणी आहे. ही मूर्ती साकारण्यासाठी किमान चार ट्रक मातीची आवश्यकता असते. परंतु जागेवर मूर्ती साकारण्यात आली असल्याने अवघे ६०० किलो एवढ्या मातीचा उपयोग करण्यात आला आहे. इतरत्र ज्यावेळी उंच मूर्ती तयार करण्यात येते. त्यावेळी मूर्तीच्या संपूर्ण स्ट्रक्चरवर किमान ४ ते ५ इंच इतका मातीचा थर दिला जातो. जेणेकरून गणेश मूर्ती ज्यावेळी ट्रान्सपोर्ट केली जाते त्यावेळी त्या मूर्तीला तडे जात नाही. परंतु ५१ फूट उंच मूर्ती साकारताना मूर्ती ट्रान्सपोर्टचा प्रश्न नव्हता. त्यामुळे अतिशय कमी मातीची परत या गणेश मूर्तीवर लावण्यात आली.</p>