<p>पुणे : सध्या सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सुरू असून पुणे शहरात मानाच्या गणेशोत्सव मंडळ तसंच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचं मोठ्या संख्येनं भाविक दर्शन घेत आहेत. तसंच अनेक लोक विविध वस्तू बाप्पाला अर्पण करत आहेत. अशातच आज एका भक्ताच्या वतीनं बाप्पा चरणी तब्बल १३३ किलोचा केक मोदक स्वरुपात बनवून अर्पण करण्यात आला आहे. सध्या मोठ्या संख्येनं भाविक हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई बाप्पाचं दर्शन घेत आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीनं ट्रस्टच्या १३३ व्या वर्षी गणेशोत्सवात केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली असून देखावा पाहण्यासाठी देखील भाविक गर्दी करत आहेत. पुण्यात हळूहळू गणेशोत्सवात रंगत भरत आहे.</p>