<p>अहिल्यानगर : मागील तीन दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईत उपोषण सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राहुरीतील सकल मराठा समाजानं शिवसेनेचे शेतकरी सेना पश्चिम महाराष्ट्रचे उपाध्यक्ष रवी मोरे यांच्या नेतृत्वात रास्तारोको आंदोलन केलं. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला राज्यातील सकल मराठा समाजाच्या बांधवांनी पाठिंबा दिला. मराठा आरक्षणासाठी शहरासह ग्रामीण भागातील मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. राहुरीसह तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीनं मंगळवारी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील मार्गावर तब्बल दीड तास रास्तारोको आंदोलन केलं. दरम्यान 5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी तहसीलदारांना निवेदन देऊन मराठा बांधवांनी आपलं आंदोलन मागं घेतलं. एवढं करुनही सरकारला जाग आली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.</p>