<p>सोलापूर : येथील केगावच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात 170 प्रशिक्षणार्थी पोलिसांना अन्नातून विषबाधा झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. बाधित सर्व प्रशिक्षणार्थींना तातडीने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्राथमिक तपासात अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून नेमकं कारण शोधण्यासाठी संबंधित विभाग कार्यरत आहे.</p><p>मंगळवारी (2 सप्टेंबर) सायंकाळच्या सत्रात अनेक प्रशिक्षणार्थींना उलटी, जुलाब आणि मळमळ होण्याचा त्रास जाणवला. त्यानंतर त्यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं. 17 जणांवर विशेष उपचार सुरू आहेत, तर उर्वरितांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात सध्या जवळपास 1400 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. बाधितांवर उपचार सुरू असून अनेकांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती आहे. सर्व प्रशिक्षणार्थ्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातून प्रशिक्षण केंद्रात हलवलं जातं आहे. केंद्रातील अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून याचा अहवाल येणं बाकी आहे.</p>