<p>बीड : जिल्ह्यातील बंजारा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला जसा हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यात आला आहे, तसाच गॅझेटियर बंजारा समाजालाही लागू करावा, अशी मागणी बंजारा बांधवांनी केली आहे. जिल्ह्यातील विविध भागांमधील बंजारा समाजाच्या आंदोलकांनी मोठ्या संख्येनं एकत्र येऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवली. बीड शहरात हजारोंच्या संख्येने बंजारा समाज बांधव एकत्र आले होते. तर वडवणी तहसील कार्यालयात याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. विशेष म्हणजे, गेल्या अनेक दिवसांपासून बंजारा समाजाची एकच प्रमुख मागणी आहे, ती म्हणजे एसटी आरक्षण लागू करणे. इतर राज्यांमध्ये या समाजाला एसटी आरक्षण मिळालं आहे, मात्र महाराष्ट्रात त्यांना याचा लाभ मिळालेला नाही. परिणामी, तांड्यावरील वाड्यावरील बंजारा समाज आजही विकासाच्या व गतीच्या बाबतीत मागं, अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली. बंजारा समाजाच्या प्रतिनिधींनी स्पष्टपणे सांगितलं की, सरकारनं जसे मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू केले, तसाच गॅझेटियर बंजारा समाजासाठी देखील लागू केला जावे. आंदोलनाची पुढील दिशा ठरवताना, बंजारा समाजानं इशारा दिला आहे की, त्यांच्या मागण्यांवर योग्य प्रतिसाद न मिळाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल.</p>