<p>बीड : बीडच्या माजलगावमध्ये 125 वर्षांची परंपरा असलेला आणि नवसाला पावणारा गणपती अशी राज्यभर ओळख असलेल्या टेंभे गणपतीला (Tembe Ganpati) सोमवारी भावपूर्ण वातावरणामध्ये निरोप देण्यात आला. गणपतीच्या दर्शनाला राज्यासह मराठवाड्यातून भाविकांनी गर्दी केली. भाविक-भक्तांकडून टेंभे गणपतीला पावणेदोन किलो चांदीचे दागिने अर्पण करण्यात आले. विसर्जन मिरवणुकीतील शाहिस्तेखानाची फजिती हा ऐतिहासिक तर जगन्नाथाचा रथ, ऑपरेशन सिंदूर या धार्मिक देखाव्यानं शहरवासीयांचे लक्ष वेधले. तर चौका-चौकांमध्ये भक्तगणांसाठी खिचडी, फराळ, फळांचे वाटप विविध मंडळांनी आणि सामाजिक संघटनांनी केले. यावेळी पोलीस निरीक्षक राहुल सुर्यतळ यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. या गणपतीचे वैशिष्ट्ये म्हणजे महाराष्ट्रातील इतर गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी रात्री उशिरा या गणपतीचं विसर्जन करण्यात येतं. हा नवसाला पावणारा गणपती म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. </p>