<p>अहिल्यानगर : जिल्ह्यातील विंग कमांडर देवेंद्र औताडे (Devendra Autade) यांनी 'ऑपरेशन सिंदूर' या मोहिमेत विशेष पराक्रम गाजवून शौर्यपदक प्राप्त केलं. आज ते श्रीरामपूर गावी परत आल्यानंतर आजी-माजी सैनिक आणि ग्रामस्थांनी शहरातून भव्य तिरंगा रॅली काढली. हातात तिरंगा घेऊन नागरिकांनी 'भारत माता की जय', 'वंदे मातरम' अशा घोषणा देत वातावरण दुमदुमवून टाकले होते. देशभक्तीपर गाण्यांच्या तालावर युवक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरात जणू देशभक्तीचा महापूर उसळला होता. रॅलीनंतर आयोजित कार्यक्रमात विंग कमांडर औताडे यांचा आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीनं सन्मान करण्यात आला. त्यांच्या पराक्रमाची माहिती उपस्थितांना देताना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की, "औताडे यांनी केलेली कामगिरी ही केवळ श्रीरामपूरचीच नाही तर संपूर्ण देशाची शान आहे." तर विंग कमांडर औताडे यांनी नम्रपणे सांगितलं की, हा सन्मान वैयक्तिक नसून भारतीय वायुसेनेतील सर्व सैनिकांचा आहे. देशाच्या सुरक्षेसाठी प्रत्येक क्षण सज्ज राहणे हेच आपलं कर्तव्य आहे. त्यांनी तरुणांना देशसेवेची प्रेरणा घ्यावी असं आवाहन केलं. या भव्य सोहळ्यामुळं श्रीरामपूर शहर देशभक्तीच्या रंगात रंगले.</p>