<p>बीड : उद्यापासून (22 सप्टेंबर) 'शारदीय नवरात्री' उत्सवाला (Shardiya Navratri 2025) सुरुवात होत आहे. नवरात्रीत नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात पायी चाल भाविकांनी ज्योत आणण्याची अनेक वर्षानुवर्षांची परंपरा आहे. बीड जिल्ह्यात अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या देवीदेवतांच्या यात्रा या आजही मोठ्या भक्तीभावानं केल्या जातात. माहूरगड हे रेणुका देवीचे (Renuka Mata) प्रसिद्ध स्थान आहे. आष्टी तालुक्यातील बेलगाव येथील रेणुकामाता देवीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. गेल्या सतरा वर्षांपासून माहुरगड येथून बेलगाव येथील शेकडो तरूण पायी ज्योत घेऊन येतात. आष्टी शहरात दहा वर्षांपासून भाऊसाहेब ढोबळे हे ज्योत घेऊन येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद देऊन ज्योतीचं जंगी स्वागत करतात. यंदाही भाविकांचं मोठ्या उत्साहानं स्वागत करण्यात आलं. </p>