<p>धाराशीव : जिल्ह्यात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळं प्रचंड नुकसान झालं आहे. आज सकाळपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळं मांजरा नदीनं पात्र सोडून धोकादायक वेग घेतला आहे. सुमारे अर्धा किलोमीटर परिसरात दोन्ही बाजूंनी नदीचा प्रवाह सुरू झाला आहे. या महापूर सदृश्य परिस्थितीमुळं वाशी तालुक्यातील जानकापूर, पांगरी, जेबा आणि आणखी काही गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाची टीम तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम सुरू आहे. दरम्यान, अहिल्यानगरहून सैन्यदल आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर बचाव कार्याला वेग आला आहे. आतापर्यंत पन्नासहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. मात्र, या आपत्तीमध्ये एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिली.</p>