<p>बुलढाणा : समाजातील विधवा, घटस्फोटित आणि एकल महिलांना सन्मानाची वागणूक मिळावी, यासाठी सुरू असलेल्या चळवळीने वेग घेतलाय. मानस फाउंडेशन आणि शिवसाई परिवाराच्या वतीनं शहरात पाचव्यांदा विधवा पुनर्विवाह सोहळा आणि एकल महिला मेळावा आयोजित करण्यात आला. या अनोख्या सोहळ्यात पाच जोडपी विवाहबद्ध झाली. आतापर्यंत अशा पाच सोहळ्यांत 115 जोडप्यांनी नवजीवनाची सुरुवात केली असून, त्यांचे संसार आता सुखासमृद्धपणं सुरू आहेत. दत्तात्रय लहाने यांनी स्थापन केलेल्या मानस फाउंडेशननं विधवा पुनर्विवाहाबाबत केवळ विवाह नाही, तर रोजगार, कौशल्य विकास आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठीही पुढाकार घेतला आहे. राज्यभरात ही चळवळ पसरत असून, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण शिबिरे, स्वयंरोजगार योजना आणि कायदेशीर मदत उपलब्ध करून दिली जाते. आजच्या सोहळ्यात पिंपरी चिंचवडच्या पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर आणि बुलढाण्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड प्रमुख अतिथी होते. </p>
