<p>अहिल्यानगर (शिर्डी) : पुणे जिल्ह्यातील नारायणगावचे रहिवासी आणि शिर्डी साईबाबांचे परमभक्त सुनिल कसबे यांनी मंगळवारी साईबाबांच्या चरणी तब्बल 123.440 ग्रॅम वजनाचं म्हणजेच सुमारे 12 तोळ्याचं नक्षीकाम असलेलं सोन्याचं कडे अर्पण केलं. या कड्याची किंमत 13 लाख 12 हजार 538 रुपये आहे, अशी माहिती संस्थानच्या वतीनं सांगण्यात आली. कसबे कुटुंब मागील अनेक वर्षांपासून शिर्डी साईबाबांचे भक्त आहेत. "साईबाबांच्या कृपेनं आम्ही लहान घरातून मोठ्या घरात गेलो. आमचं सर्व दुःख साईबाबांनी दूर केलं. त्यामुळं साईबाबांना काही तरी देण्याची अनेक दिवसांपासून इच्छा होती. अखेर आज साईबाबांना आकर्षक नक्षीकाम असलेलं सोन्याचं कडे अर्पण केलं. साईबाबांना सोन्याचं कडे देण्याचं कारण असं की साईबाबांनी कायम आम्हाला त्यांच्या चरणाजवळ जागा दिली आहे. त्यामुळं आज साईबाबांना सोन्याचं कडे दिलं. या कड्याच्या निमित्तानं कायम साईबाबांच्या चरणाजवळ आम्ही राहू," अशी भावना सुनिल कसबे यांनी व्यक्त केली. </p>