<p>रायगड : जिल्ह्यातील माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी धनगर समाजाचा पारंपरिक दसरा मेळावा यंदाही मोठ्या जल्लोषात पार पडला. सकाळी धार्मिक विधींनी सुरुवात झालेल्या या मेळाव्याची दुपारी ढोल-ताशांच्या गजरात काढलेल्या मिरवणुकीनं रंगत वाढवली. सकाळी समाजाचे आराध्य दैवत मानल्या जाणाऱ्या पिसारनाथ मंदिरात महापूजा आणि होम-हवन विधी पार पडले. त्यानंतर पुण्यश्लोक राजामाता अहिल्यादेवी होळकर चौकातून बाजारपेठ मार्गे पिसारनाथ मंदिरापर्यंत भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषा, महिला-पुरुषांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळं संपूर्ण माथेरान परिसरात उत्साही वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवासेना रायगड जिल्हा अधिकारी प्रसाद थोरवे, हर हर चांगभले धनगर समाज रायगड जिल्हाध्यक्ष संतोष आखाडे, उपाध्यक्ष व सरपंच बाळासाहेब आखाडे, सचिव अनंता हिरवे, कर्जत तालुका अध्यक्ष तुकाराम आखाडे, माथेरान शहराध्यक्ष राकेश कोकळे, तसेच महिला अध्यक्षा संगीता रामचंद्र ढेबे, माजी नगरसेविका सुनीता आखाडे, रुपाली शिंगाडे यांच्यासह समाजातील ज्येष्ठ नेते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.</p>