<p>बारामती : महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुराने अनेक भागांत प्रचंड हानी केली आहे. शेतजमिनी, घरे, जनावरे आणि गावोगावची पायाभूत साधनं पाण्याखाली गेल्याने हजारो कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातून पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी विविध संस्था, मंडळं आणि देवस्थानं पुढे येत आहेत.</p><p>याच मदतीच्या ओघात महाराष्ट्राचे कुलदैवत मानल्या जाणाऱ्या जेजुरीच्या खंडोबाच्या श्री. मार्तंड देवस्थानकडून मोठी आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे यांनी जेजुरी गडावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. देवस्थानच्या वतीने पूरग्रस्तांसाठी तब्बल एक कोटी अकरा लाख रुपयांची मदत केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी देव संस्थांचे विश्वस्त देखील उपस्थित होते.</p><p>या रकमेतून 51 लाख रुपये थेट मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले जाणार आहेत, तर उर्वरित मदत वस्तूरूपाने करण्यात येणार आहे. विशेषतः ज्या भागांमध्ये शेतकऱ्यांचे जास्त नुकसान झाले आहे, त्या ठिकाणी देवस्थानच्या वतीने धान्य, औषधे, कपडे आणि इतर अत्यावश्यक वस्तू पोहोचवल्या जाणार आहेत.</p>