<p>रायगड : जिल्ह्यात सत्ताधाऱ्यांमधील संघर्ष चिघळत आहे. मंत्री भरत गोगावले यांना डावलण्याचा प्रयत्न खासदार सुनील तटकरे करत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेनं केलाय. मंत्री गोगावले यांची दिवसेंदिवस वाढती लोकप्रियता पाहून तटकरेंनी त्यांचा धसका घेतलाय असं शिवसैनिकांचं म्हणणं आहे. खासदार तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून वैयक्तिक भूमिपूजनं आणि कार्यक्रम करून स्वतःचं आस्तित्व जपण्याचा प्रयत्न करत आहेत. असा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. शुक्रवारी माणगाव आणि इंदापूर बायपास कामाच्या भूमिपूजनाचा मोठा कार्यक्रम खासदार तटकरे यांनी केला. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत मंत्री भरत गोगावले यांचं नाव नसल्यानं शिवसैनिक नाराज झालेत. मंत्री असूनही गोगावले यांना सतत डावललं जात असल्याचा आरोप करत खासदार सुनील तटकरे यांच्यावर शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर आणि युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केलेत. </p>