<p>शिर्डी : करोडो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून हजारो भाविक दररोज शिर्डीत येतात. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज शिर्डी दौऱ्यावर असल्यानं राज्यातील अनेक मंत्री शिर्डीत दाखल झाले आहेत. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आज शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं. साई दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना बाबासाहेब पाटील म्हणाले की, "गोपीनाथ मुंडे महामंडळाला 10 रुपये दिले जात होते. मात्र यंदाच्या वर्षी कायद्यात अशी तरतूद आहे की साखर कारखान्याकडून मदत मिळू शकते. अतिवृष्टीग्रस्तांना मदत म्हणून जे 5 रुपये घेतले आहेत. ती मदत ऊसातून नाही तर कारखान्याच्या व्यवस्थापनातून घेतले आहेत." सप्टेंबर महिन्यापूर्वी राज्यात झालेल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली गेली आहे. सप्टेंबर महिन्यानंतर झालेल्या अतिवृष्टीग्रस्त भागात जाऊन पाहणी केली जात आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार पुन्हा मदत करत आहे. पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसान भरपाई देण्यात येईल. वेगवेगळ्या टप्प्यात शेतकऱ्यांना सरकारकडून मदत दिली जाणार असल्याचंही बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं.<br> </p>