<p>बीड : जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. या मुसळधार पावसामुळं जिल्ह्यांतील नद्यांना महापूर आला असून अनेक गावांमध्ये नदीचं पाणी शिरलं आहे.आष्टी तालुक्यातील वाघळूज येथील खंडोबावस्तीमध्ये गेल्या 15 दिवसांपासून 500 हून अधिक नागरिकांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. पावसामुळं बंधाऱ्यावरचा रस्ता वाहून गेल्यानं नागरिकांना उपासमारीची वेळ आली आहे. अन्नधान्य, दूध आणि किराणा दोरीच्या साहाय्यानं आणण्याची वेळ ओढवली आहे. ग्रामस्थ मथूरा पवार यांनी भावनिक आवाहन करत मुख्यमंत्रींकडे हेलिकॉप्टरची मागणी केली. "पुल मंजूर झाला म्हणतात, पण आम्हाला तोपर्यंत हॅलिकॉप्टर द्या, पुल तयार झाला की परत घ्या," असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, शाळकरी मुलांना आणि वृद्धांना जीव मुठीत धरून बंधाऱ्यावरून जायची वेळ येत आहे. ग्रामस्थांनी शासनानं तातडीनं मदत करावी, अशी मागणी केली आहे.</p>