<p>शिर्डी (अहिल्यानगर) : संपूर्ण देशभरात कोजागिरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरातही शरद पौर्णिमा भक्तिभाव आणि आनंदात पार पडली. पहाटेच्या काकड आरतीनंतर साईबाबांच्या मूर्तीला मंगलस्नान घालण्यात आलं आणि त्यानंतर सोन्याच्या अलंकारांनी मूर्तीला सजवण्यात आलं होतं. यानंतर साईबाबा समाधी मंदिरासमोरील स्टेजवर रात्री 7 ते 10 दरम्यान, कलाकारांच्या वतीनं धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. तसंच रात्री 11 ते 12 या वेळेत साईबाबा मंदिरात अभिषेक पूजा, तसंच लक्ष्मी आणि इंद्र यांचा पूजाविधी मंदिरातील पुजाऱ्यांच्या हस्ते पार पडला.</p><p>रात्री 12 वाजता साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सहपत्नीक चंद्र, लक्ष्मी आणि इंद्र यांची पूजा करून दुधात चंद्र पाहिला. त्यानंतर साईबाबांच्या रात्रीच्या शेजआरतीला सुरुवात झाली. आरतीनंतर सर्व साईभक्तांना आणि ग्रामस्थांना दुधाचा प्रसाद देण्यात आला. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दुधात चंद्र पाहिल्यानं आरोग्यप्राप्ती होते, अशी मान्यता आहे. साई संस्थानतर्फे तब्बल 400 लिटर दूध, केशर, बदाम आणि काजू घालून तयार केलेला प्रसाद भाविकांना देण्यात आला.</p>