<p>बीड : बीड जिल्ह्यासह राज्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर आता सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केलं आहे. मात्र, हे सरकारने जाहीर केलेलं पॅकेज फसवं आहे, असं म्हणत बीडमध्ये शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय. या पॅकेजमधून शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडणार नाही. ज्या खरडून जमिनी गेल्या आहेत, त्याची भरपाई मनरेगातून होईल, असं म्हणतात. मात्र, मनरेगातून काहीच मिळत नाही, असं म्हणत बीडमध्ये सरकार विरोधात निदर्शने करत शिवसेना - उबाठा पक्षाने आंदोलन केलं.</p><p>मागील महिन्याभरापासून झालेल्या मुसळधार पावसानं मराठवाड्याचं मोठं नुकसान झालं. शेतकऱयांचे घरं, जनावरं पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. शेती देखील खरडून वाहून गेली. त्यामुळं पुढील अनेक वर्ष या शेतात पिक येणार नसल्याचं बोललं जातंय. शेतकरी राजाला पुन्हा उभा करण्यासाठी सर्वच स्तरातून मदत केली जात आहे. सरकारनं देखील मदतीची घोषणा केली. मात्र, त्यावर विरोधकांनी टीका केली.</p>