<p>बीड : जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात खळबळजनक प्रकार समोर आला आहे. सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या कुटुंबावर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात टोळक्यानं प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात चार महिला गंभीर जखमी झाल्या असून, एका महिलाची प्रकृती अत्यवस्थ आहे. मध्यरात्री 10 ते 15 जणांच्या टोळक्यानं अचानक हल्ला चढवला. महिलांनी जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा केला. मदतीसाठी किंकाळ्या फोडल्या, पण टोळक्याला कोणताही पाझर फुटला नाही. थेट डोक्यावर, पाठीत आणि पायांवर वार केले. या मारहाणीत सर्व महिला जखमी झाल्या. जखमी महिलांनी कसाबसा पोलीस ठाण्याचा रस्ता धरला आणि शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत जखमींना बीडच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असून सध्या तिथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.</p>