<p>बारामती : रासपचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी इंदापूर तालुक्यातील एलगार मेळाव्यात सरकारचा चांगलाच समाचार घेतला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून राजकीय स्थैर्यापर्यंत अनेक मुद्द्यांवर त्यांनी सडेतोड भूमिका घेतली. “भल्या भल्याचं सरकार आम्ही उलथावली आहेत. हे सरकार उलथवायला पण जास्त वेळ लागणार नाही,” असा इशारा त्यांनी सध्याच्या सरकारला दिला आहे. यावेळी जानकर पुढे म्हणाले, “23 किंवा 24 तारखेला सांगोल्यात आम्ही एक मोठी परिषद आयोजित केली आहे. या परिषदेसाठी तीस ते पस्तीस हजार लोकांचा जमाव अपेक्षित आहे. त्यासाठी आमचा सगळा बंदोबस्त सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार आणि रासप या तिन्ही संघटना एकत्र येऊन ताकद दाखवण्याचं काम करणार आहे. माणसं कमी असली तरी आमची ताकद कमी नाही. आम्ही पाच माणसांनी सरकार बदलली आहेत. त्यामुळं काळजी करण्याचं काही कारण नाही. आम्ही शनिवारी चंद्रपूर, नागपूर इथून रात्री प्रवास करून आलोय. आम्ही खचून जाणारे नाही, लढत राहणारे आहोत.”</p><p>जानकर यांनी सरकारच्या शेतकरी धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “शेतकऱ्यांच्या नावावर मतं घेऊन हे सरकार सत्तेवर आलं. पण शेतकऱ्यांना दिलासा नाही. विधानसभेत मुख्यमंत्री मोठमोठी भाषणं देतात, ‘शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू’ असं म्हणतात. पण कोणी विचारावं, खरंच सातबारा कोरा झाला का?” सोयाबीनच्या एका एकरावर 22 हजार खर्च येतो आणि सरकार म्हणतं आम्ही साडेआठ हजार रुपये देतो. नदीकाठची जमीन वाहून गेली तर सहा लाखांचा खर्च येतो, पण सरकार फक्त 47 हजार रुपये देते. असं करून शेतकऱ्यांना न्याय मिळतो का? पश्चिम महाराष्ट्रातील नेते मोठे झाले आणि शेतकरी भिकारी झाले आहेत.”</p>
