<p>अहिल्यानगर : पुण्यातील गुंड निलेश घायवळ आणि बंधू सचिन घायवळ सध्या विविध कारणामुळे चर्चेत आले आहेत. निलेश घायवळ याचं पासपोर्ट प्रकरण चांगलंच गाजलं होतं. पासपोर्ट प्रकरणानंतर घायवळ याला मिळालेल्या शस्त्र परवान्यांवरुन आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच आता घायवळ याच्या मामांनी माध्यमांसमोर एक मोठा गौप्यस्फोट केलाय. निलेश आणि सचिन घायवळ यांच्या मामांनी थेट रोहित पवार आणि तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करत 2019 मध्ये निलेश घायवळ याला अमरावती जेलमधून पवार आणि देशमुख यांनीच सोडवल्याचा खुलासा मामा जानकीराम गायकवाड यांनी केलाय. निलेश आणि सचिन घायवळ हे दोघेही आमदार रोहित पवारांसोबत होते. मात्र, गावातील गायरान जमीन सोलर प्लांटसाठी घेण्याच्या रोहित पवारांच्या निर्णयाला घायवळ बंधूंनी विरोध केला. याच विरोधातून त्यांच्यात दुरावा निर्माण झाला आणि त्यानंतर रोहित पवारांकडून त्यांच्यावर आरोप सुरू झाले, असा ग्रामस्थांचा दावा आहे.</p>