रायगड - जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त “रन ऑफ इंटिग्रिटी” या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या विशेष उपक्रमात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्यासह प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि सुमारे ७०० विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.

लोणेरे विद्यापीठात ‘रन ऑफ इंटिग्रिटी’ मॅरेथॉनला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भारतीय मानक ब्युरोच्या वतीने देशभरात “रन ऑफ इंटिग्रिटी” हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे तरुणाईमध्ये प्रामाणिकपणा, एकात्मता आणि राष्ट्रीय भावना दृढ करणे हा आहे. त्याचाच एक भाग म्हणून रायगड जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथे आज मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले.

सकाळच्या थंडगार वातावरणात “भारत एकात्मतेसाठी धावतेय” या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. या वेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी विद्यार्थ्यांना प्रामाणिकतेचा आणि जबाबदारीचा संदेश दिला. समाज आणि देशाला एकात्मतेचा संदेश देण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

या मॅरेथॉनमध्ये विविध विभागांतील विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले. ३ किमी, ५ किमी आणि १० किमी या गटांमध्ये स्पर्धा पार पडली. कार्यक्रमादरम्यान भारतीय मानक ब्युरोचे अधिकारी गोपीनाथ यांनी उपस्थितांना प्रामाणिकतेचे आणि राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व पटवून दिले.

कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी विद्यापीठातील अधिकारी, शिक्षकवर्ग आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.