रायगड - मनसे महाड शहर प्रमुख पंकज उमासरे यांच्यावर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी अद्यापही आरोपींना अटक न झाल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने येत्या सोमवारी महाड बंदची हाक दिली आहे.

गेल्या आठवड्यात महाडमधील चवदार तळे परिसरातील त्यांच्या दुकानात घुसून पंकज उमासरे यांच्यावर काही जणांनी गंभीर मारहाण केली होती. या हल्ल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी चार दिवस उलटूनही आरोपींना अटक झालेली नाही. त्यामुळे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

आज या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, वाहतूक सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष संजय नाईक, तसेच राज्य प्रवक्ता योगेश चिले हे महाड येथे दाखल झाले. त्यांनी प्रथम पंकज उमासरे यांच्या दुकानाला भेट देत त्यांच्याशी संवाद साधला, तसेच त्यानंतर थेट महाड शहर पोलिस ठाण्यात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली.

या भेटीदरम्यान मनसे नेत्यांनी पोलिसांच्या कारवाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत सांगितले की “मारहाण होऊन चार दिवस झाले तरी आरोपी मोकाट फिरत आहेत, पोलिस मात्र मौन बाळगत आहेत. जर शनिवारपर्यंत दोषींवर कारवाई झाली नाही, तर सोमवारी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल.”

अविनाश जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “मनसे शहर प्रमुखावर हल्ला होतो आणि आठ दिवस झाले तरी आरोपींना अटक होत नाही ही गोष्ट असह्य आहे. पोलिसांनी निष्क्रियतेचे आवरण झटकून त्वरित कारवाई करावी. अन्यथा सोमवारी मनसेसह शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या संयुक्त पुढाकाराने महाड बंद पाळला जाईल.”

मनसेच्या या बंदच्या हाकेमुळे महाड शहरातील व्यापारी, नागरिक आणि राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. येत्या काही दिवसांत आरोपींना अटक होते का आणि पोलिस प्रशासन या वाढत्या दबावाला कशा प्रकारे प्रतिसाद देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.