<p>शिर्डी : संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक संस्थेचे डी. के. मोरे जनता विद्यालय येथे आज वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी देशभक्तीचा अविस्मरणीय सोहळा साजरा केला. या प्रसंगी 850 विद्यार्थ्यांनी विद्यालय परिसरात मानवी साखळी तयार करून सामूहिकरित्या वंदे मातरम् चे गायन करत मातृभूमीला वंदन केले. विद्यालयाचे प्राचार्य साहेबराव कोल्हे यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम राबवण्यात आला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी या दिवसाचे औचित्य साधून भारतीयत्वाची भावना जागवणारा सुंदर उपक्रम साकारला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक बाळासाहेब कांडेकर आणि कला शिक्षक सत्यानंद कसाब यांनी परिश्रम घेतले. तसंच उपमुख्याध्यापक प्रताप आहेर यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचारी यांची उपस्थिती होती. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, एकता आणि राष्ट्रीय अभिमानाची भावना दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला.</p>
