<p>ठाणे : भिवंडीतील सलाउद्दीन पिरानी पाडा येथील कंपाऊंडमध्ये उभी असलेल्या स्कोडा कारला आज संध्याकाळच्या सुमारास अचानक भीषण आग (Skoda Car Fire) लागली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, गाडीचा क्रमांक MH 01 BF 7889 आहे. आग लागताच वाहनातून निघालेल्या धुरामुळं परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिकांनी तत्काळ आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि आसपास उभ्या असलेल्या इतर गाड्या सुरक्षित स्थळी हलवल्या. माहिती मिळताच अग्निशमन दलाची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि आगीवर नियंत्रण मिळवलं. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, कारच्या बाजूलाच कचऱ्याचा ढीग होता. याच कचऱ्याला कोणीतरी आग लावली. त्यामुळं ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही. तर कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. पोलिसांनी घटनेची चौकशी सुरू केली आहे. तसंच या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.</p>
