<p>बुलढाणा : उद्धव ठाकरे यांच्या टीकेला संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर देत त्यांच्यावर हल्लाबोल केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली होती. “कोणी बाबा मला मारलं म्हणून दिल्लीत रडत बसले आहेत,” असे टोले त्यांनी लगावले होते. या टीकेचे शिवसेना (शिंदे गट) आमदार तथा बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे दिल्लीला जाऊन सोनिया गांधींचे पाय पकडतात, तेव्हा त्यांना कोण मारतं? आणि तेही ‘आई मला मारलं’ म्हणत सोनिया गांधींच्या पायाला धरून रडत बसतात का?,” गायकवाड पुढे म्हणाले की, “आमचे नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या हितासाठी दिल्लीत जातात, तर उद्धव ठाकरे फक्त सत्तेसाठी, खुर्चीसाठी दिल्लीत हात जोडत फिरतात. आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वासाठी लढतो, ते मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसलेत.” शिंदे गटाच्या या प्रत्युत्तरामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, दोन्ही शिवसेनांमधील शाब्दिक युद्ध आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.<br><br> </p>
