<p>पुणे : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra Death) यांचं आज निधन झालं. त्यांच्यावर विलेपार्ले येथील सेवा समाज संचलित हिंदू स्मशान भूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. धर्मेंद्र यांची शेवटची छबी पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी मोठ्या संख्येनं स्मशानभूमी बाहेर गर्दी केली होती. देशभर धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली जात असताना पुण्यात देखील त्यांचे मित्र मंजीतसिंग विरदी यांनी धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. धर्मेंद्र यांचं निधन झाल्यानंतर पुण्यातील कॅम्प परिसरातील आपल्या शॉपमध्ये त्यांनी धर्मेंद्र यांच्या आठवणी जागवल्या. पुण्यातील कॅम्प परिसरातील मंजीतसिंग विरदी हे लहानपनापासून धर्मेंद्र यांचे चाहते असून त्यांच्या वडिलांनी धर्मेंद्र यांची ओळख करून दिली आणि त्यानंतर त्या दोघांची मैत्री घट्ट झाली होती.</p>
