<p>अहिल्यानगर : कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी सावकारानं एका शेतकऱ्याला चक्क स्वतःची किडनी विकायला भाग पाडल्याची गंभीर घटना समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मिंथूर गावात घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. "सावकारानं शेतकऱ्याला त्याची किडनी विकायला लावण्याची घटना संपूर्ण महाराष्ट्राची मान शरमेनं खाली घालायला लावणारी आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषिमंत्री यांनी तातडीनं या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली पाहिजे. शेतकऱ्यावर किडनी विकण्याची वेळ आली असेल, तर दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि शेतकऱ्याला सरकारनं तातडीनं मदत दिली पाहिजे. सरकारच्या शेती धोरणामुळं शेतकरी कर्जबाजारी होत आहे. राज्य सरकारनं शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलं तरी अशा घटना घडत असतील तर ही दुर्दैवी गोष्ट आहे. सरकारकडून देण्यात येणाऱ्या कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यानं सावकाराकडून घेतलेल्या कर्जमाफीचाही समावेश झाला पाहिजे," अशी मागणी शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी केली.</p>
