<p>रायगड : खोपोली येथे झालेल्या मंगेश काळोखे यांच्या निर्घृण हत्येला आज बारा दिवस पूर्ण झाले आहेत. मंगेश यांची हत्या तब्बल वीस लाख रुपयांची सुपारी देऊन करण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. आतापर्यंत या प्रकरणात काही आरोपींना अटक करण्यात आली असली, तरी या हत्येमागचे मुख्य सूत्रधार अद्याप मोकाट आहेत. काळोखे कुटुंबीयांनी थेट राष्ट्रवादीचे प्रवक्ते भरत भगत आणि जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यावर गंभीर आरोप करत, हेच या हत्येचे मुख्य सूत्रधार असून त्यांना अजूनही अटक का करण्यात आली नाही? असा थेट सवाल उपस्थित केलाय. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, हत्येच्या दिवशी मुख्य आरोपी रवींद्र देवकरला भरत भगत यांनी वारंवार फोन केले होते. याबाबतचे कॉल डिटेल्सही माध्यमांसमोर सादर करण्यात आले असून, तरीसुद्धा पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्यानं कुटुंबीयांनी तपासावर संशय व्यक्त केलाय. “आम्हाला केवळ आरोपी अटक नकोत, तर या संपूर्ण कटामागील मुख्य सूत्रधारांना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे,” अशी ठाम भूमिका काळोखे कुटुंबीयांनी घेतली आहे.</p>
