<p>कोल्हापूर - कोल्हापूर महापालिकेत दुपारी साडेतीन वाजेपर्यंत चुरशीनं 50.85 टक्के मतदान झालं. मात्र मतदानाची वेळ संपत आल्यानंतर कोरगावकर हायस्कूल या मतदान केंद्रावर मतदारांनी लक्षणीय गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं. सायंकाळी साडेपाच वाजता मतदानाची वेळ संपल्यानंतर मतदान केंद्रात असलेल्या मतदारांनाच प्रशासनानं मतदानाची परवानगी दिली. मात्र ही संख्या अधिक असल्यानं मतदान प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी उशीर होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्ह्यातील वस्त्रननगरी इचलकरंजीत 65 जागांसाठी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 48.23 टक्के मतदान झालं होतं. दुपारी चार वाजल्यानंतर मतदान केंद्रावर मतदारांनी मतदान करण्यासाठी रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळालं. किरकोळ अपवाद वगळता ईव्हीएम मशीन मधील तांत्रिक बिघाड आणि उमेदवारांमधील किरकोळ बाचाबाची वगळता जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.</p>
